
दोषींवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन; पालकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा केला आरोप
अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.) | आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनआयसीयू विभागाची पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पाहणीनंतर त्यांनी मृत नवजात शिशूच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपल्या व्यथा आरोग्यमंत्र्यांसमोर मांडत डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.
तीन नवजात शिशूच्या दुर्दैवी मृत्यूमुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात धाव घेतली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रहारचे वसू महाराज मृत शिशूच्या पालकांसह रुग्णालयाबाहेर त्यांची वाट पाहत बसले होते. आरोग्यमंत्र्यांनी एनआयसीयू विभागाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाबाहेर येत मृत शिशूच्या पालकांची भेट घेतली. यावेळी पालकांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी