राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेवरील एम.ए. अभ्यासक्रमाला यूजीसी मान्यता देण्याची मागणी
अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.)। नागपूर येथील विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव दिले आहे, त्याच विद्यापीठातील त्यांच्याच विचारधारेवरील एम. ए. अभ्यासक्रमाला यूजीसी मान्यता नसणे ही खेदजनक बाब आहे. या अभ्यासक्रमाला तातडीने यूजीसी मान्यता मिळाव
राष्ट्रसंत विचारधारा एमएला यूजीसी मान्यता मिळावी नागपूर विद्यापीठाने तातडीने पाठपुरावा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा


अमरावती, 25 ऑगस्ट (हिं.स.)। नागपूर येथील विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव दिले आहे, त्याच विद्यापीठातील त्यांच्याच विचारधारेवरील एम. ए. अभ्यासक्रमाला यूजीसी मान्यता नसणे ही खेदजनक बाब आहे. या अभ्यासक्रमाला तातडीने यूजीसी मान्यता मिळावी, अशी मागणी राष्ट्रसंतप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांना देण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत विचारधारेवर आधारित एम. ए. अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, पण यूजीसी मान्यता नसल्यामुळे पीएच.डी. सारख्या पुढील शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. या प्रश्नी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, पण ठोस कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रसंतप्रेमींच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचे दाखले देत सांगितले की, राष्ट्रसंतांचे साहित्य युवापिढी घडवणारे आहे. नैराश्यात असलेली पिढी या साहित्यातून प्रेरणा घेऊन स्वावलंबी जीवन जगू शकते. शिष्टमंडळात आचार्य वेरूळकर, प्रेमकुमार बोके, ज्ञानेश्वर रक्षक, हेमंत टाले, रवी मानव आदींचा समावेश होता.

कागदपत्रेच नाहीत

शिष्टमंडळाने यूजीसी मान्यतेसाठी विद्यापीठाने केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे मागितली असता ती तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने नेमकी काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली. यूजीसी मान्यतेचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande