
वॉशिंग्टन , 25 ऑगस्ट (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केलेल्या किंवा सध्या आश्रय मिळवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सुमारे २ लाख परदेशी नागरिकांचे बिझनेस आणि टुरिझम व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हिसा रद्द करण्याची ही सर्वात मोठी कारवाई ठरू शकते. या योजनेला कायदेशीर आव्हान दिले गेले नाही किंवा त्यात बदल करण्यात आला नाही, तर येत्या काही आठवड्यांत परराष्ट्र विभागाकडून या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक माध्यमाने परराष्ट्र विभागाच्या कागदपत्रांचा आणि अमेरिकी अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, या कारवाईत २०१६ ते २०२६ दरम्यान जारी करण्यात आलेल्या बी १ आणि बी २ व्हिसांचा समावेश असेल. हे व्हिसा अशा व्यक्तींना देण्यात आले होते, ज्यांनी अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे किंवा सध्या आश्रय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, “आम्ही होमलँड सिक्युरिटी विभागासोबत मिळून अशा परदेशी नागरिकांची ओळख पटवत आहोत आणि त्यांचे नॉन-इमिग्रंट व्हिसा रद्द करत आहोत, जे अल्पकाळासाठी पर्यटक म्हणून अमेरिकेत आले होते; मात्र त्यानंतर येथे कायमस्वरूपी राहण्यासाठी त्यांनी आश्रयासाठी अर्ज केला.”पिगॉट यांनी रद्द होऊ शकणाऱ्या व्हिसांची निश्चित संख्या सांगितली नाही. त्यांनी म्हटले की, ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने रद्द करण्यात येणाऱ्या व्हिसांची संख्या बदलत राहू शकते आणि ही कारवाई सातत्याने केली जाईल.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, व्हिसा रद्द झाल्याचा अर्थ संबंधित व्यक्तीला तात्काळ अमेरिकेतून हद्दपार केले जाईल, असा नाही. ज्यांचे आश्रयाचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, त्यांना त्यांच्या दाव्यांवर पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्याचा अधिकार मिळू शकतो. मात्र, त्यांचा बिझनेस किंवा टुरिझम व्हिजिटरचा दर्जा संपुष्टात येईल.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून अमेरिकेतील व्हिसा आणि इमिग्रेशन नियम अधिक कडक करण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचा हा निर्णय एक भाग असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode