
अमरावती, २५ ऑगस्ट (हिं.स.) : मेळघाटातील चुरणी येथे पशुपालकांच्या सुविधेसाठी श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत सध्या वापराविना पडून आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून उभारलेल्या या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ पशुपालकांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
चुरणी परिसरात गाय, म्हैस यांसह मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पशुधनाची नियमित तपासणी आणि वेळेवर उपचारासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. मात्र, चुरणी येथे बराच काळ नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जनावर आजारी पडल्यास उपचारासाठी पशुपालकांना दूरवरच्या ठिकाणी जावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरांची प्रकृती गंभीर होण्याची भीती असते. दुर्गम आणि आदिवासी भागातील पशुपालकांना जनावरांना उपचारासाठी ने-आण करण्याचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे.
नवीन दवाखान्याची इमारत तयार असूनही नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ही सुविधा प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची नियमित तपासणी, लसीकरण, औषधोपचार तसेच आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे पशुपालक या मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
पशुधन हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने पशुवैद्यकीय सेवेतील ही कमतरता त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करू शकते.
चुरणी येथील श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून नवीन इमारत तत्काळ सुरू करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वी पशुवैद्यकीय विभागाने तातडीने दखल घेऊन नियमित सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा परिसरातील पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी