
बंगळुरु, २६ ऑगस्ट (हिं.स.) जम्मू आणि काश्मीरचा डावखुरा फिरकी अष्टपैलू क्रिकेटपटू आबिद मुश्ताकच्या शानदार नऊ बळींच्या कामगिरीमुळे नॉर्थ झोनने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील वेस्ट झोनला ५२ धावांनी पराभूत करून दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फिरकी गोलंदाजांनी लाल मातीच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवत सामन्यात २५ बळी घेतले. दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण नऊ बळी घेत आबिद मुश्ताकने नॉर्थ झोनच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
अंतिम दिवशी, वेस्ट झोनला विजयासाठी ६७ धावांची, तर नॉर्थ झोनला तीन गडींची गरज होती. मुश्ताक आणि निशांत सिंधूने अवघ्या ६.३ षटकांत वेस्ट झोनचा डाव गुंडाळला. चौथ्या दिवशी, मुशीर खान आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी भागीदारीनंतर मुश्ताकने वेस्ट झोनला मोठा धक्का दिला. त्याने अंतिम दिवसाची सुरुवात तनुश कोटियनला त्रिफळाचीत करून केली. त्यानंतर तुषार देशपांडे स्लिपमध्ये अब्दुल समदकरवी झेलबाद झाला. तीन चेंडूंनंतर, निशांत सिंधूने उर्विल पटेलला २५ धावांवर पायचीत (LBW) करून वेस्ट झोनचा डाव संपवला.
अर्शदीप सिंगनेही नॉर्थ झोनसाठी उत्कृष्ट कामगिरी करत चार बळी घेतले. अंशुल कंबोजने पहिल्या डावात ६० धावा केल्यानंतर, गोलंदाजीतही प्रभाव पाडत शम्स मुलानी आणि कोटियन यांचे बळी घेतले. नॉर्थ झोनने पहिल्या डावात २५१ आणि दुसऱ्या डावात २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट झोनला केवळ १८७ आणि २३४ धावाच करता आल्या.
उपांत्य फेरीत नॉर्थ झोनचा सामना तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साऊथ झोनशी होईल. दुसरा उपांत्य सामना पूर्व विभाग आणि गतविजेता मध्य विभाग यांच्यात होईल. दोन्ही सामने ३० ऑगस्टपासून बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळले जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे