
जळगाव, 26 ऑगस्ट (हिं.स.)जळगावच्या नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिला चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही महिला एकमेकींच्या देराणी-जेठाणी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले . अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे उषा चंदन ससाणे (४८, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव, मूळ रा. चाळीसगाव) आणि अनिता विजय ससाणे (३५, रा. वाघ नगर, जळगाव) अशी आहेत. १८ जुलै रोजी जळगावहून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि टॉगल चोरीला गेले होते.
या प्रकरणी २० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित महिलांचा माग काढला. त्यानंतर दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत दोन्ही महिलांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याची मणी मंगळसूत्रे आणि टॉगल असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही महिलांविरोधात अमळनेर आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे महिला चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर