गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला ४ लाखांचा गंडा
Rs 4 lakh embezzled by claiming that gas bill was pending
गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला ४ लाखांचा गंडा


बनावट क्रमांकावरून फोन; लिंक पाठवून बँक खात्यातून परस्पर रक्कम लंपास

नाशिक, २६ ऑगस्ट (हिं.स.) : गॅसचे बिल पेंडिंग असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला लिंक पाठवत त्याच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिश पगारिया (रा. गंगापूर रोड, नाशिक) हे १९ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास कॉलेज रोड येथील गोदावरी सोसायटीतील पगारिया इन्फोमेटिक्सच्या कार्यालयात होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने एमजीएनएल कंपनीच्या नावाने बनावट क्रमांकावरून त्यांना फोन केला.

गॅसचे बिल थकीत असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने पगारिया यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. पगारिया यांनी लिंकवर माहिती भरल्यानंतर त्यांच्या आयडीएफसी बँक खात्यातून ४ लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारिया यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जमिर शेख करीत आहेत.

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती भरू नये, तसेच अशा प्रकारच्या फोनपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande