गर्भावस्था आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आयोडिनयुक्त मीठ आवश्यक
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट (हिं.स.) : आयोडिनयुक्त मीठ हे आहारातील आयोडिनची गरज पूर्ण करण्यासोबतच आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. दैनंदिन आहारात मिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने,
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, 26 ऑगस्ट (हिं.स.) : आयोडिनयुक्त मीठ हे आहारातील आयोडिनची गरज पूर्ण करण्यासोबतच आयोडिन कमतरता विकार (आयडीडी) रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. दैनंदिन आहारात मिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायजेशनच्या शिफारशीनुसार मिठात आयोडिन मिसळले जाते.

‘भारत आयोडिन सर्वेक्षण २०१८-१९’नुसार, देशातील सुमारे ७६.३ टक्के कुटुंबे किमान १५ पीपीएम आयोडिन असलेले मीठ योग्य प्रमाणात वापरतात. मात्र, केवळ २२.४ टक्के लोकांनाच आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे माहिती असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच, योग्य आयोडिन पोषणामुळे गळू (गोईटर) टाळण्यास मदत होते, याची माहिती केवळ ६१.४ टक्के लोकांना असल्याचे आढळले.

आयोडिन हे शरीरातील थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक घटक आहे. आयोडिनची कमतरता झाल्यास आयोडिन कमतरता विकारांचा धोका वाढू शकतो. त्याचा मानसिक आणि शारीरिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय पोषण संस्था (एनआयएन) यांच्या शिफारशीनुसार, किशोरवयीन आणि प्रौढांसाठी दररोज सुमारे १४० मायक्रोग्रॅम, १ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी ९० ते १०० मायक्रोग्रॅम, तर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी २२० ते २८० मायक्रोग्रॅम आयोडिनची आवश्यकता असते.

गर्भधारणेदरम्यान आयोडिनची कमतरता झाल्यास गर्भातील बाळाच्या मेंदूच्या आणि बौद्धिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भधारणेपासून मुलाच्या सुरुवातीच्या बाल्यावस्थेपर्यंतचा काळ मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याने या कालावधीत थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी पुरेसे आयोडिन मिळणे आवश्यक मानले जाते.

आयोडिनची कमतरता झाल्यास थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी होऊ शकते. परिणामी चयापचयाची प्रक्रिया मंदावणे आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराच्या सामान्य कार्यासाठी आहारातून आवश्यक प्रमाणात आयोडिन मिळणे महत्त्वाचे आहे.

देशात आयोडिनयुक्त मिठाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला, तरी त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत जनजागृती वाढवण्याची गरज आकडेवारीतून स्पष्ट होते. आयोडिनचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि योग्य आहाराच्या माध्यमातून त्याचे सेवन याबाबत नागरिकांना माहिती देणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, टाटा सॉल्ट १९८३ मध्ये भारतीय बाजारात दाखल झाले. राष्ट्रीय स्तरावर ब्रँडेड आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करून देणाऱ्या सुरुवातीच्या ब्रँड्सपैकी एक म्हणून या ब्रँडने आयोडिनयुक्त मिठाच्या वापराबाबत जागरूकता वाढविण्यात भूमिका बजावली आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande