

रायगड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे येथे मुलाकडे राहण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद फ्लॅटसह शेजारील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नेरळ येथील भोपले रोड, हजारेनगर परिसरातील दृष्टी आर्केडमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपले रोड, हजारेनगर येथील दृष्टी आर्केडच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २०३मध्ये फिर्यादी राहत असून, ते पत्नीसमवेत ठाणे येथे मुलाकडे गेले होते. त्याचप्रमाणे त्यांचे शेजारीही ठाणे येथे राहत असल्याने दोन्ही फ्लॅट बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप व कडीचा हुक तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादीच्या फ्लॅटमधून सुमारे चार तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला. याशिवाय शेजारील फ्लॅट क्रमांक २०२ मधून एक तोळे सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपये रोख लंपास करण्यात आले.
दोन्ही फ्लॅटमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलिसांत नोंदविण्यात आले आहे.या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक वरक हे पुढील तपास करीत आहेत. बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)