
जळगाव, 26 ऑगस्ट, (हिं.स.) | नशिराबाद शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी तब्बल २७ विद्युत खांबांदरम्यान असलेल्या ॲल्युमिनियमच्या विद्युत तारा कापून चोरून नेल्या आहेत. या चोरीमुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद शिवारातील विविध शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरट्यांनी कापून नेली. फिर्यादी समाधान दिलावर कोतवाल हे नशिराबाद अर्बन विद्युत केंद्र येथे प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, नशिराबाद कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिनी व इतर साहित्याच्या देखरेखीचे काम पाहतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नशिराबाद विद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांना जितेंद्र महाजन यांचा फोन आला. त्यांच्या शेतातील विद्युत खांबांवरील तार दिसत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी नशिराबाद परिसरातील न्यू मुंजोबा डीटीसी क्रमांक ४२३९०६७ (भागपूर एजी फिडर) वरील तसेच संबंधित शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी गायब असल्याचे आढळून आले. अज्ञात व्यक्तींनी विद्युत तार कापून तोडून चोरून नेल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, तक्रार महाजन, वाय.जी. महाजन, सोपान पाटील तसेच जितेंद्र यशवंत महाजन यांच्या शेतातील आणि परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण २७ विद्युत खांबां दरम्यान असलेली ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या तारांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विद्युत विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तसेच संबंधित नागरिकांकडे चौकशी केली. मात्र चोरीबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी विद्युत विभागाची संमती न घेता व लबाडीच्या उद्देशाने विद्युत वाहिनी कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता एफआयआर क्रमांक ०२३७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपी म्हणून सध्या अज्ञात व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजेश बाबुराव मेढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर