
पलनाडू, 27 ऑगस्ट (हि.स.) : आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात आज, गुरुवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. चिलकलुरिपेट राष्ट्रीय महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बस आणि ऑटो-रिक्षाची जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात 7 जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी झाले आहेत.
यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, मृतांपैकी सर्वजण चिलकलुरिपेट मंडलातील वेलुरू गावचे रहिवासी होते. हे सर्वजण एका कार्यक्रमासाठी कोंडामंजुलुरू येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ऑटो-रिक्षातून वेलुरू येथे परतत असताना चिलकलुरिपेट राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला.दरम्यान, अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल बस विजयवाडाहून तिरुपतीच्या दिशेने जात होती. अपघातात जखमी झालेल्या 10 जणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबद्दल आंध्रप्रदेशचे परिवहन मंत्री मंदीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात सात जणांचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. रस्ते अपघातांमध्ये मौल्यवान जीव गमावले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना रामप्रसाद रेड्डी म्हणाले, प्रवासाने लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले पाहिजे, त्यांच्या अंतिम प्रवासापर्यंत नाही.दरम्यान, परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य आणि तातडीने उपचार मिळतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच अपघातस्थळी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही परिवहन मंत्री रामप्रसाद रेड्डी यांनी नागरिकांना केले आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी