
बीड, २७ ऑगस्ट (हिं.स.) : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड करून दोन साउंड मॉनिटर चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने नाट्यगृहातील कर्मचाऱ्याला धमकी देत प्रवेशद्वाराची काच फोडल्याचे समोर आले आहे. तसेच नगर परिषदेच्या घंटागाडीचीही तोडफोड करण्यात आली.
या प्रकरणी प्रतीक उर्फ गड्या जगन्नाथ गायकवाड, रोहन दहिवाळ आणि रितेश वीर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने तपास करून ताब्यात घेतले.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी बीएनएससह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis