
मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'लास्ट मॅन इन टॉवर' या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. बेन रेखी दिग्दर्शित हा चित्रपट प्रसिद्ध लेखक अरविंद अडिगा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. याची निर्मिती अभिनेता राणा दग्गुबाती याच्या 'स्पिरिट मीडिया' या निर्मिती संस्थेद्वारे केली जात आहे. २०२५ मध्ये सुरू झालेल्या या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच हिंदी फीचर फिल्म (चित्रपट) प्रकल्प आहे. मनोज यांना यापूर्वी 'गव्हर्नर: द सायलेंट सेविअर'मध्ये पाहण्यात आले होते.
'लास्ट मॅन इन टॉवर'च्या टीझरमध्ये मनोज बाजपेयी एका निवृत्त शालेय शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. टीझरची सुरुवात त्यांच्या पात्राने शाळेच्या छतावर उभे राहून केलेल्या एका विधानाने होते. केवळ समाज किंवा आसपासचे लोक एखाद्या व्यक्तीकडे कशा दृष्टीने पाहतात, यावरून त्या व्यक्तीची ओळख ठरत नाही. त्यानंतर टीझरमध्ये त्यांच्या पात्राचा समाजाशी असलेला संघर्ष दिसून येतो, ज्यामुळे चित्रपटाच्या गंभीर आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयाची झलक मिळते.
मनोज बाजपेयी यांच्याव्यतिरिक्त दिव्या दत्ता आणि बोमन इराणी हे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट अशा एका व्यक्तीचा संघर्ष मांडतो, जो आपल्या आसपासचे लोक आणि सामाजिक व्यवस्थेविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतो. 'लास्ट मॅन इन टॉवर' ११ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या 'हैवान' या आगामी चित्रपटाशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर