
मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि बहुआयामी अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता आगामी मराठी चित्रपट 'मृत्यूचक्र'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या पुष्कराजची या चित्रपटातील भूमिका सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
श्रीमहादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केलं आहे.
‘मृत्यूचक्र’ हा रहस्य आणि थराराने भरलेला चित्रपट असून, या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा कथानकाला वेगळी दिशा देणारी आहे. अशा या रहस्यमय वातावरणात पुष्कराज चिरपुटकर ‘गुरु’ या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. मात्र, ‘गुरु’ नेमका कोण आहे आणि या कथेत त्याची भूमिका काय आहे, याबाबत निर्मात्यांनी सध्या कमालीची गुप्तता राखली आहे.
पुष्कराजने आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विनोद असो किंवा गंभीर भूमिका, त्याच्या अभिनयातील सहजता नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे. त्यामुळे ‘मृत्यूचक्र’मध्ये तो कोणत्या नव्या अंदाजात दिसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
चित्रपटाच्या शीर्षकापासून ते त्यातील व्यक्तिरेखांपर्यंत अनेक गोष्टी रहस्याच्या आवरणात ठेवण्यात आल्या आहेत. ‘गुरु’ या व्यक्तिरेखेची पहिली झलक समोर आल्यानंतर आता त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मात्र या व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
‘मृत्यूचक्र’मध्ये पुष्कराज चिरपुटकरचा ‘गुरु’ नेमका कोणत्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटगृहातच मिळणार आहे. ‘मृत्यूचक्र’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर