बीडमध्ये मंदिरात जलाभिषेक करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्यात परंपरेनुसार मंदिरात देवाला गोदावरीचे जल अर्पण करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय होतकरू तरुणाचा विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील नारद
अपघाती मृत्यू


बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

पवित्र श्रावण महिन्यात परंपरेनुसार मंदिरात देवाला गोदावरीचे जल अर्पण करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय होतकरू तरुणाचा विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील नारद स्वामी मंदिरात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. युवराज आसाराम चौरे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जीवाचीवाडी येथील नारद स्वामी मंदिरात श्रावण महिन्यात दररोज गावातील एका व्यक्तीने गोदावरी नदीचे पाणी आणून देवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. याच परंपरेनुसार युवराज चौरे हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून माजलगाव तालुक्यातील मोगरा शिवारात गेले होते. तेथून गोदावरीचे पवित्र जल घेऊन ते गावात परतले. युवराज अत्यंत भक्तीभावाने ओल्या कपड्याने मंदिरात देवाला जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. मात्र, गाभाऱ्याजवळ जमिनीवर पडलेल्या उघड्या विद्युत वायरवर त्यांचा पाय पडला आणि विजेचा तीव्र झटका बसल्याने ते जागीच कोसळले.

घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गंभीर अवस्थेतील युवराज यांना तातडीने धारूर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर धारूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी जीवाचीवाडी येथील काळअंबा वस्तीवरील शेतात शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत युवराज यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार असून, ऐन तारुण्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande