
लातूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी; विना हेल्मेट वाहन चालवल्यास १ हजार रुपयांचा दंड
दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या, वाढती वाहतूक आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना गंभीर दुखापत होण्यासह जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ वाहतूक नियम नसून जीवन वाचविणारे सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येत आहे.
या नियमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे.
पहिला टप्पा : राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग
१ सप्टेंबरपासून प्रथम राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्गांवर हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकींची वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन सुरुवातीला या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा : जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग
यानंतर लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण मार्गांवर हेल्मेट वापराबाबत कारवाई करण्यात येणार आहे. या मार्गांवर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून अपघातांचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांनीही हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य राहणार आहे.
तिसरा टप्पा : लातूर शहरातील प्रमुख मार्ग
तिसऱ्या टप्प्यात लातूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते आणि शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर हेल्मेट वापराबाबत विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.
विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास मोटार वाहन कायद्यातील कलम १२९/१९४(डी) नुसार कारवाई करण्यात येणार असून १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.
संपूर्ण लातूर जिल्ह्यात नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करून सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण करण्याचा लातूर पोलिसांचा प्रयत्न आहे. नागरिकांकडून नियमितपणे हेल्मेटचा वापर होईपर्यंत हेल्मेट नियमाच्या अंमलबजावणीसाठी दंडात्मक कारवाई सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis