
परभणी, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ अंतर्गत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
याच धर्तीवर परभणी जिल्ह्यात ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय योजनेत स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये डेअरी प्रोसेसर, शेळीपालन, रेशीम उद्योग, शिलाई मशीन प्रशिक्षण, चर्मकार प्रशिक्षण, जिनिंग मशीन फिटर, हापसा/हातपंप दुरुस्ती (प्लंबर), शेळी व मेंढीपालन, नीडल क्राफ्ट ऑफ बंजारा/बंजारी, सोलार क्षेत्र आदी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना किमान ५० टक्के लाभार्थी महिला असणे आवश्यक असून, एकल महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
दरम्यान, स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत तसेच संलग्नता व मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रे व प्रशिक्षण प्रदाते यांनी परभणी जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याबाबतचे प्रस्ताव ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे सादर करावेत.
जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित प्रशिक्षण केंद्रे व प्रशिक्षण प्रदात्यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, परभणी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis