
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
हजारो लाडक्या बहिणींनी खासदार डॉ. अनिल बोंडे व आमदार प्रविण पोटे पाटील यांना बांधल्या राख्या
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी, अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात भाऊ-बहिणीच्या नात्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या कॅम्प रोड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित या सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी हजारो लाडक्या बहिणींनी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील तसेच शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, चेतन गावंडे यांसह भाजप पदाधिकाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाल्याने हा सोहळा भावनिक आणि संस्मरणीय ठरला.रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेत आपले बाळ गमावलेल्या पुलगाव येथील पूजा स्वप्नील बोरगे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत*सुपूर्द करण्यात आली. तसेच मिसबा अमजद हुसेन आणि हिना तौसूद तस्लिम खान यांनाही आर्थिक मदत देण्यात आली. कठीण प्रसंगी पक्ष त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.“रक्षाबंधन हा केवळ प्रेमाचा उत्सव नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिवस आहे. भगिनींनी दिलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गरजू कुटुंबांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहून समाजसेवेचा हा प्रवास यापुढेही सुरू ठेवू,” असे प्रतिपादन आमदार प्रविण पोटे पाटील व खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केले.या सोहळ्याला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, चेतन गावंडे, महिला मोर्चा अध्यक्ष सुधाताई तिवारी, लताताई देशमुख, भारतीताई गुहे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी