उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी
युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल – उपमुख्यमंत्री पवार मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.) - बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पा
सुनेत्रा अजित पवार


युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.) - बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विकासकामे निर्धारित वेळेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिल्या.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. तब्बल २.९६ एकर परिसरात ३४ कोटी ६७ लाख ७ हजार ४३३ रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले हे क्रीडा संकुल खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा आणि उत्तम क्रीडा वातावरण उपलब्ध करून देणारे ठरणार असल्याचे सांगितले.

या संकुलात २८ कार आणि ७१ दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था, वेटिंग हॉल, कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, बॉक्सिंग हॉल, जिम्नॅशियम, झुंबा व एरोबिक्स हॉल, महिला व पुरुषांसाठी थेरपी एरिया यांसह फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, ज्युडो, रेसलिंग, कराटे, टेबल टेनिस आणि शूटिंग रेंज अशा विविध क्रीडा सुविधांचा समावेश आहे. तसेच विविध क्रीडा उपक्रम आणि स्पर्धांसाठी मल्टीपर्पज हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगून उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देऊन सुविधा दीर्घकाळ टिकतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कुमारी जानवी वीरकर या युवा खेळाडूचा तसेच कबड्डी प्रशिक्षक दादासो आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बारामती परिसरातील खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची माहितीही यावेळी देण्यात आली.

यानंतर सुनेत्रा पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथील रेशीम कोष केंद्राची पाहणी केली. रेशीम कोष उत्पादन, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथील ॲग्री मॉलच्या बांधकामाची पाहणी करून प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. बांधकामाची गती वाढविण्यासोबतच कामाचा दर्जा कायम राखण्याच्या सूचना केल्या. प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या उपयोगात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही दिले.

जळोची येथील उपबाजारातील मार्केट कमिटीच्या इमारतीच्या बांधकामाचीही पाहणी केली. यावेळी कामाची सद्यस्थिती, पूर्णत्वाची अपेक्षित मुदत आणि उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. विकासकामे केवळ वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे नसून त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणाही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यादृष्टीने विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेताना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून विकासकामांना गती द्यावी आणि नागरिकांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, गटविकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande