नेपाळ भीषण महापूरातील मृतांचा आकडा 547 वर
- मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान- सर्वात जुना म्हणजे 260 वर्ष जुना मार्ग पूर्णपणे नेस्तनाबूत काठमांडू, 28 ऑगस्ट (हिं.स.) : बुधवारी आलेल्या भीषण महापुरानंतर मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत हा आकडा 547 वर पोहोचल्याची माहिती नेपाळ सरकारकडून
नेपाळ महाप्रलय


नेपाळ महाप्रलय


नेपाळ बचावकार्य


- मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान- सर्वात जुना म्हणजे 260 वर्ष जुना मार्ग पूर्णपणे नेस्तनाबूत

काठमांडू, 28 ऑगस्ट (हिं.स.) : बुधवारी आलेल्या भीषण महापुरानंतर मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत हा आकडा 547 वर पोहोचल्याची माहिती नेपाळ सरकारकडून दिली जात आहे. दरम्यान या भीषण महाप्रलयानंतर मृतांची संख्या वाढत असतानाच प्रशासनासमोर आता मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विविध जिल्ह्यांमधील शवागरांची क्षमता संपत असून, पुराच्या पाण्यात वाहून गेलेले मृतदेह रासुवा आणि नुवाकोटपासून दूरच्या चितवन, तनाहुन, गोरखा आणि नवलपरासीपर्यंत आढळत आहेत. नुवाकोट जिल्ह्यातील विदूर नगरपालिकेच्या देवीघाट भागात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरं चिखलात गाडली गेल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

नेपाळ आणि चीन यांच्यात एकमेकांना हवामान आणि भूवैज्ञानिक अद्ययावत माहिती देण्याची व्यवस्था आहे. तरीही या पुराबाबत आधी कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती मिळाली नव्हती, असं नेपाळच्या जल आणि हवामान विभागाने म्हटलं आहे. चीनने नेपाळला या घटनेबाबत आधी कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे एवढी मोठी हानी झाली, असा दावा या बातम्यांमध्ये करण्यात येत आहे. परंतु, नेपाळमधील चीनच्या दूतावासाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

चीनच्या दूतावासाने 'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये या बातम्या खोट्या असल्याचे म्हटलं आहे. दूतावासाने पोस्टमध्ये लिहिलं, 26 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये भूकंप किंवा हिमनदी कोसळल्यामुळे भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर भूस्खलन झाले आणि अनेक जणांचा यात मृत्यू झाला. या घटनेमध्ये नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांतील अनेक लोक बेपत्ता झाले.

या पुरात आतापर्यंत किमान ५40 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वाढत्या मृतदेहांमुळे प्रशासनाने शेजारील जिल्ह्यांमध्ये मृतदेह हलवण्यास सुरुवात केली असून, काही ठिकाणी रिकाम्या इमारतींचे तात्पुरत्या शवागरांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. नुवाकोट, धादिंग आणि नवलपरासी येथील शवागरांची क्षमता अपुरी पडू लागल्याने मृतदेह पोखरासह इतर जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. मात्र पोखरातील रुग्णालयांवरही आता क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवण्याची वेळ आली आहे.

चितवनमध्ये रुग्णालयांच्या शवागरांमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने भरतपूरमधील वापरात नसलेल्या एका इमारतीचे मृतदेह ठेवण्याचे तात्पुरत्या केंद्रात रूपांतर केले आहे. चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी गणेश आर्याल यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील रुग्णालयांच्या शवागरांमध्ये केवळ ३० ते ५० मृतदेह ठेवता येतात. नव्या तात्पुरत्या केंद्रात सुमारे २५० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जर ही जागा अपुरी पडल्यास देवघाट येथील विद्युत स्मशानभूमी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भरतपूर महानगरपालिका या सुविधेची दुरुस्ती करून तेथे एअर कंडिशनर बसवणार असून, मृतदेह कुजण्याची प्रक्रिया मंदावण्यासाठी ड्राय आईसचा वापर केला जाणार आहे.

पोखरा अकादमी ऑफ हेल्थ सायन्सेसचे माहिती अधिकारी सुशील आर्याल यांनी सांगितले की, सध्या मृतदेह २ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवले जात आहेत. या तापमानात मृतदेह साधारण १० दिवस ते दोन आठवडे सुरक्षित ठेवता येऊ शकतात. मात्र त्यापेक्षा जास्त काळ साठवणूक करायची असल्यास शून्याखालील तापमान कायम ठेवणे आवश्यक आहे. पोखरामध्ये अशी व्यवस्था सध्या उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाकडे बॉडी बॅग, संरक्षण साहित्य आणि शवविच्छेदनासाठी आवश्यक कर्मचारी पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र ओळख न पटलेले मृतदेह सातत्याने सापडत राहिल्यास परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मृतदेहांची संख्या वाढत असल्याने पोखरातील शवागरेही भरू लागली आहेत. पुराचा मोठा फटका बसलेल्या तनाहुन, गोरखा, पूर्व नवलपरासी आणि धादिंग येथून आतापर्यंत ९३ मृतदेह पोखरात आणण्यात आले आहेत. कास्कीचे मुख्य जिल्हाधिकारी कुमार सिंह गुरूंग यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून ८८ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. पोखरा अकादमी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये ७२ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे.

26 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात रासुवागढी-केरुंग मार्ग पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे. नेपाळचा हा सर्वात जुना म्हणजे 260 वर्ष जुना मार्ग आहे. नेपाळला तिबेटशी जोडणारा हा हिमालयातून जाणारा मार्ग होता. हा रस्ताचे आता मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सामानांची ने आण आणि लोकांच्या वर्दळीचा हा मुख्य मार्ग होता. दोन देशांमधील हा पारंपारिक मार्ग होता. नेपाळ आणि चीन दरम्यान व्यापारासाठीचा हा महत्त्वाचा रस्ता होता. आता हाच रस्ता बंद झाल्याने त्याचा दोन्ही देशातील व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे.

या भीषण पूरस्थितीत अनेक नागरिक घरांच्या छतांवर आणि बाल्कनींमध्ये अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आणि विनाशकारी आहे की, अनेकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचणे शक्य झालेले नाही. ही दृष्यं अतिशय भयावह असून, नैसर्गिक आपत्तीची भीषणता स्पष्टपणे दिसून येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande