न्यूयॉर्क : ‘अहेड’चे एक्स अकाऊंड पुन्हा बहाल
- सरसंघचालकांच्या कार्यक्रमापूर्वी झाले होते निलंबित - संघटनेने म्हटले, ‘आम्ही पुन्हा परतलो आहोत’ न्यूयॉर्क, 27 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील प्रस्तावित कार्यक्रमाच्या काही काळ आधी आयोज
मोहन भागवत, सरसंघचालक (फाईल फोटो)


- सरसंघचालकांच्या कार्यक्रमापूर्वी झाले होते निलंबित

- संघटनेने म्हटले, ‘आम्ही पुन्हा परतलो आहोत’

न्यूयॉर्क, 27 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील प्रस्तावित कार्यक्रमाच्या काही काळ आधी आयोजक संस्था ‘अहेड’चे एक्स खाते निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता हे खाते पुन्हा बहाल करण्यात आले आहे. ‘अहेड’ संघटनेने एक्सवर ‘आम्ही पुन्हा परतलो आहोत’ असा संदेश प्रसिद्ध करत खाते पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

‘अहेड’ संघटनेने आपल्या अधिकृत हँडलवर पोस्ट करत म्हटले, “आम्ही पुन्हा परतलो आहोत.” काही विरोधकांनी एक्सच्या अल्गोरिदमचा गैरवापर करून बॉट्सच्या माध्यमातून आपले खाते ब्लॉक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एक्स आणि त्याच्या सपोर्ट टीमचे आभार मानताना संघटनेने सांगितले की, खाते तातडीने बहाल करण्यात आले असून कथित बॉट्सही हटवण्यात आले आहेत.‘अहेड’ने म्हटले आहे की, आता संघटना आपल्या मुख्य उद्देशांकडे म्हणजे ‘युनिव्हर्सल हार्मनी’ आणि ‘युनिव्हर्सल वननेस’ यांच्या उत्सवाकडे पुन्हा लक्ष केंद्रित करणार आहे.

मोहन भागवत यांचा हा कार्यक्रम शनिवार, 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये ‘युनिव्हर्सल ओणम/वननेस सेलिब्रेशन’ अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक जनसंपर्क अभियानाचा हा भाग आहे. या कार्यक्रमाला सुमारे 5 हजार भारतीय-अमेरिकन नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. खाते निलंबित झाल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात ‘अहेड’ संघटनेने हे निलंबन बहुधा चुकीने झाले असावे, असे म्हटले होते.

अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनचा दौरा

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा हा दौरा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाचा भाग आहे. अमेरिका दौऱ्यानंतर ते कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार आहेत. याच अभियानांतर्गत 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमात सुमारे 5 हजार भारतीय वंशाचे नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या कार्यक्रमाला अमेरिकेत राजकीय विरोध आणि निदर्शने सुरू झाली आहेत.

सरसंघचालकांच्या अमेरिका दौऱ्यावरून न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांना मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील प्रस्तावित कार्यक्रम रद्द करायला हवा का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण या रॅलीचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. मात्र, एखादा खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, याची आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या विरोधात ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ यांसह भारत आणि हिंदू संस्कृतीविरोधात सक्रिय असलेल्या काही संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलच्या बाहेर निदर्शने केली. या संघटनांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाकडे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.

आयोजकांकडून ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश

सरसंघचालकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ‘अहेड फोरम’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमाचा उद्देश संपूर्ण जगाला एकत्र आणणे हा आहे. आयोजकांच्या मते, कार्यक्रमाचा मुख्य संदेश ‘वसुधैव कुटुंबकम्’, म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’, हा आहे. कृत्रिम विभाजन आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन परस्पर सन्मान, सद्भावना आणि एकतेची भावना स्वीकारण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचा हा परदेश दौरा व्यापक जागतिक संपर्क अभियानाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दौऱ्याची तीन प्रमुख उद्दिष्टे

-भारत, हिंदू समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जगभरात असलेल्या गैरसमज आणि कथित अपप्रचाराच्या पार्श्वभूमीवर तथ्याधारित आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडणे.

भारतातील ऋषी-मुनींच्या परंपरेतून प्राप्त झालेला ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि जागतिक एकात्मतेचा संदेश विविध देशांतील समाजांपर्यंत पोहोचवणे.

परदेशात राहणाऱ्या हिंदू आणि भारतीय वंशाच्या नागरिकांच्या हितसंबंध व अधिकारांबाबत तेथील मुख्य प्रवाहातील समाजासोबत संवाद वाढवणे.

या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत न्यूयॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमासोबतच टोरंटो आणि लंडन येथे सामुदायिक नेतृत्वाशी संबंधित कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.

संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, शताब्दी वर्षात जागतिक स्तरावर संपर्क आणि संवाद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

एचएएफकडून सुरक्षा ऍडवायझरी

या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकास्थित स्वयंसेवी संस्था हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत.फाउंडेशनने नागरिकांना सतर्क राहण्याचे, आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि परस्पर संवादाच्या वेळी संयम व शालीनता राखण्याचे आवाहन केले आहे.एचएएफच्या म्हणण्यानुसार, काही कार्यकर्ते हिंदू-अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा आणि तो रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा सूचना जारी करण्यात आली आहे. फाउंडेशनने महापौर ममदानी यांच्याकडे कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची खात्री करण्याचीही मागणी केली आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande