कोल्हापूर - अवैध सावकारीतून पिळवणूक झाल्यास समितीकडे तक्रार करण्याची मागणी
कोल्हापूर, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन अवैध सावकारांच्यावर त्वरीत कार्यवाही करावी. सावकारांच्या पाशात अडकलेल्या अगर सावकारांकडून पिळवणूक होत असलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याबाबत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे स
कोल्हापूर - अवैध सावकारीतून पिळवणूक झाल्यास समितीकडे तक्रार करण्याची मागणी


कोल्हापूर, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन अवैध सावकारांच्यावर त्वरीत कार्यवाही करावी. सावकारांच्या पाशात अडकलेल्या अगर सावकारांकडून पिळवणूक होत असलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याबाबत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आश्वासित केले आहे. तरी अवैद्य सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी समितीकडे मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीस प्रभावीरितीने प्रतिबंध करण्यासाठी समुचित व कठोर सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना करणे तसेच महाराष्ट्र सावकारीच्या व्यवहारांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी शासनाचा महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अस्तित्वात आहे. अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. यासाठी जिल्हास्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य आहेत व सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीमार्फत जिल्ह्यातील अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यात येते.

आर्थिक पिळवणूक अगर अवैध सावकारीत स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार भवन, १ ला मजला, हॉटेल पर्लजवळ, न्यु शाहूपुरी, कोल्हापूर किंवा कार्यालयाचा ईमेल ddrkolhapur@gmail.com व कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२३१-२६५६२५८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande