
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला.
महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis