
काठमंडू, 28 ऑगस्ट (हिं.स.) : नेपाळमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या भीषण महापुरातील मृतांचा आकडा 469 वर पोहोचला आहे. नेपाळ पोलिसांनी शुक्रवारी या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत संख्या जाहीर केली आहे.
नेपाळच्या भोटे कोशी-त्रिशूली कॉरिडॉरसह पूरग्रस्त भागात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तसेच अडकलेल्या शेकडो नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरू आहे. दरम्यान, चीनने तिबेटच्या बाजूला या आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेटमधील या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 472 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये सुमारे 910 जण बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या आकडेवारीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी उशिरा केलेल्या आकलनाचाही समावेश आहे. त्यानुसार, नेपाळमध्ये 288 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
नेपाळ सरकारने अद्याप मृतांची राष्ट्रीयत्वानुसार स्वतंत्र यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, सीमेपलीकडील तिबेटमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळपर्यंत 558 जण बेपत्ता असल्याची माहिती दिली. मात्र, चीननेही बेपत्ता नागरिकांची देशनिहाय आकडेवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या यादीत किती भारतीय किंवा इतर देशांचे नागरिक आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय तिबेटमध्ये सुमारे 200 भारतीय नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, नेपाळमध्ये संपर्काबाहेर असलेल्या 288 भारतीय नागरिकांपैकी 73 जण त्रिशूली-1 जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कर्मचारी आहेत. बेपत्ता नागरिकांमध्ये तिबेटमधील कैलास पर्वत यात्रेसाठी गेलेले किंवा यात्रा पूर्ण करून परतणारे पर्यटक आणि भाविकांचाही समावेश आहे.
यातील अनेक नागरिक तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत तामिळनाडूतील 21 पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. त्यांना काठमांडू येथे आणले जात होते. तसेच तिबेटमध्ये अडकलेल्या अन्य 200 भारतीय नागरिकांनीही भारतीय अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या आकडेवारीनुसार, बेपत्ता किंवा संपर्काबाहेर असलेल्या भारतीय पर्यटकांची संख्या 178 आहे. भारताने जाहीर केलेल्या 288 या आकडेवारीत जलविद्युत प्रकल्पातील कर्मचारी तसेच पर्यटन मंडळाच्या यादीत समाविष्ट नसलेल्या इतर गटांचाही समावेश असल्यामुळे दोन्ही आकडेवारीत फरक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेपाळच्या पर्यटकांच्या यादीत भारतीय नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी सांगितले की, गुरुवारी 59 हवाई उड्डाणांच्या माध्यमातून 573 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. बचावकार्य अधिक वेगाने राबवण्यासाठी नेपाळी लष्करासह खासगी हेलिकॉप्टर्सची तैनाती करण्यात आली आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी