मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; यवतमाळकडे पायी कूच
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.) : विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो व
आदिवासी विद्यार्थी अमरावतीहून पायीच निघाले यवतमाळच्या दिशेने, मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन तीव्र..


अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.) : विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो विद्यार्थी यवतमाळच्या दिशेने पायी निघाले आहेत.

आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे देवगाव मार्गावर पोहोचले. विद्यार्थ्यांनी पायी जाण्याऐवजी खासगी वाहनांची व्यवस्था करून देण्याची तयारी खासदार वानखडे आणि माजी आमदार जगताप यांनी दर्शविली. मात्र, विद्यार्थी पायीच यवतमाळला जाण्यावर ठाम राहिले.

दरम्यान, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी मार्गावरील सांगुलवाडा येथे पोहोचले. विद्यार्थ्यांनी पायी चालत जाणे योग्य नसल्याचे सांगत प्रशासनाने त्यांना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. आदिवासी विकासमंत्री स्वतः विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येण्यास तयार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांनी पायी यवतमाळ गाठण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. बाभुळगावमार्गे यवतमाळला पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांनी यापूर्वी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.

आंदोलक विद्यार्थ्यांनी १४ ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करावा, वसतिगृहांची क्षमता वाढवावी, जुना अध्यादेश रद्द करावा, जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे आणि केंद्रीय स्वयंपाकगृह बंद करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. याशिवाय १२ हजार ५०० अधिसंख्य पदांची तसेच ८५ हजार रिक्त पदांची भरती करावी, सर्पदंश आणि प्रकृतीकडे दुर्लक्षामुळे मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अमरावती ते यवतमाळ मार्गावर प्रशासनाची धावपळ वाढली असून, विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande