
नाशिक, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
घरातील फरशी बसविताना लोखंडी पाइपचा वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून 28 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच कारगिल चौक, दत्तनगर, चुंचाळे परिसरात घडली. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेमकुमार चंद्रदीप पंडित (वय 28, रा. कामगारनगर, सातपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रेमकुमार हे त्यांचे भाऊ संजित यांच्यासोबत चुंचाळे परिसरातील खोली क्रमांक दोनमध्ये फरशी बसविण्याचे काम करीत होते. काम सुरू असताना त्यांच्या हातातील लोखंडी पाइपचा जवळून जाणार्या वीजवाहिनीला अचानक स्पर्श झाला. त्यामुळे प्रेमकुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर भाऊ संजित आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI