यामाहाची नवी वायझेडएफ-आर२ भारतात लाँच
सुरुवाती किंमत २.३० लाख रुपयांपासून मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। यामाहाने अखेर आपली बहुप्रतीक्षित नवी स्पोर्ट्स बाइक वायझेडएफ-आर२ भारतीय बाजारात लाँच केली आहे. वायझेडएफ-आर१५नंतरची ही नवी बाइक असल्याने बाइकप्रेमींमध्ये तिची मोठी चर्चा होती. कंपनीने
Yamaha New YZF-R2 Launched India


सुरुवाती किंमत २.३० लाख रुपयांपासून

मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। यामाहाने अखेर आपली बहुप्रतीक्षित नवी स्पोर्ट्स बाइक वायझेडएफ-आर२ भारतीय बाजारात लाँच केली आहे. वायझेडएफ-आर१५नंतरची ही नवी बाइक असल्याने बाइकप्रेमींमध्ये तिची मोठी चर्चा होती. कंपनीने १२ ऑगस्ट २०२६पासून १० हजार रुपयांत आर२साठी प्री-बुकिंग सुरू केली होती.

वायझेडएफ-आर२ नव्या स्टील फ्रेमवर तयार करण्यात आली असून या फ्रेमचे वजन केवळ १४ किलो आहे. बाइकला २०४ सीसीचे सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १० हजार आरपीएमवर २६.५ हॉर्सपॉवर आणि ८ हजार आरपीएमवर १९.१ एनएम टॉर्क निर्माण करते. आर१५प्रमाणे आर२मध्येही लिक्विड कूलिंग आहे; मात्र आर२मध्ये डीओएचसी सेटअप देण्यात आला आहे, तर आर१५मध्ये एसओएचसी सेटअप आहे. आर२मध्ये व्हीव्हीए तंत्रज्ञान नसले तरी व्हॉल्व्हवर डायमंड-लाइक कार्बन म्हणजे डीएलसी कोटिंग करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान यामाहाच्या फ्लॅगशिप वायझेडएफ-आर१मध्येही पाहायला मिळते.

आर१५चा डेल्टाबॉक्स फ्रेमऐवजी आर२मध्ये नवीन डायमंड स्टील फ्रेम वापरण्यात आली आहे. त्यामुळे बेस व्हेरिएंटचे कर्ब वजन १४९ किलो असून मिड आणि टॉप व्हेरिएंटचे वजन १५० किलो आहे. सीटची उंची ८१० एमएम आहे. कमी वजन आणि अधिक पॉवरमुळे आर२चा सामना केटीएम आरसी २०० आणि हिरो करिझ्मा एक्सएमआरसारख्या बाइक्सशी होण्याची शक्यता आहे.

आर२ तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटची किंमत २.३० लाख रुपये, मिड व्हेरिएंटची किंमत २.३९ लाख रुपये, तर टॉप आर२ एम व्हेरिएंटची किंमत २.५३ लाख रुपये आहे. या सर्व किंमती दिल्ली एक्स-शोरूम आहेत. बाइकला राइड-बाय-वायर थ्रॉटल, तीन राइडिंग मोड, असिस्ट आणि स्लिपर क्लच, ३७ एमएम यूएसडी फोर्क्स आणि ड्युअल-चॅनेल एबीएस देण्यात आले आहेत. पाच इंच टीएफटी डॅश आणि ट्रॅक्शन कंट्रोलही मिळते.

मिड व्हेरिएंटमध्ये बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि बॉडी-कलर्ड अलॉय व्हील्स आहेत. तर आर२ एममध्ये प्रीलोड-ऍडजस्टेबल सस्पेंशन, ऍडजस्टेबल ब्रेक व क्लच लीव्हर्स, फॉक्स-सुएड सीट आणि कीलेस सिस्टम मिळते. बाइकची डिलिव्हरी सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होणार असून ती केवळ यामाहाच्या ब्लू स्क्वेअर नेटवर्कमधून खरेदी करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande