
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। व्यावसायिक आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे निफ्टी 50 आणि सेन्सेक्सने हिरव्या निशाणावर व्यवहार सुरू केला. त्याचवेळी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअर केविन वॉर्श यांच्या जॅक्सन होल सिंपोजियममधील भाषणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या व्याजदरांबाबत त्यांच्या भूमिकेतून जागतिक बाजारपेठेला महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
सकाळी 9.18 वाजता सेन्सेक्स 193.02 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 77,126.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 मध्ये 33.80 अंकांची किंवा 0.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 24,124.65 अंकांवर पोहोचला. त्यानंतरच्या व्यवहारात निफ्टीने सुमारे 60 अंकांची वाढ नोंदवत 24,150 च्या आसपास व्यवहार केला. मात्र, बँक निफ्टीमध्ये सुमारे 35 अंकांची घसरण झाली असून तो 57,472 च्या पातळीवर होता.
निफ्टीवरील तेजीचे नेतृत्व आयटी शेअर्सनी केले. टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्फोसिस हे प्रमुख आघाडीचे शेअर्स ठरले. निफ्टी आयटी निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर पुढील व्यवहारात या निर्देशांकातील तेजी अडीच टक्क्यांपेक्षा जास्त झाली. याशिवाय मीडिया, मेटल आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला.
व्यापक बाजारपेठेत निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.03 टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.16 टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकांमध्ये तुलनेने कमजोरी दिसून आली. तांत्रिक पातळीवर निफ्टीसाठी 24,000 आणि 23,800 हे महत्त्वाचे आधारस्तर मानले जात आहेत. या स्ट्राइकवर मोठ्या प्रमाणात पुट ओपन इंटरेस्ट असल्याने या पातळीवर खरेदीचा आधार मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वरच्या बाजूला 24,378 हा अलीकडील स्विंग हाय निफ्टीसाठी तातडीचा प्रतिरोध ठरू शकतो.
दरम्यान, डाऊ फ्युचर्स आणि आशियाई बाजार सकारात्मक राहिल्याने भारतीय बाजारालाही आधार मिळाला. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 88 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अद्याप स्पष्ट राजनैतिक तोडगा न निघाल्याने तेलाच्या किमती आणि त्याचा जागतिक बाजारावर होणारा परिणाम याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule