
ठाणे, 28 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे शहराला ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासत असताना शहरात मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. परिणामी पाणी टंचाईसह अनेक समस्या गंभीर होणार आहेत. त्यामुळे शहराच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १२४व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणीटंचाई संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक गृहसंकुलांना सहा-सहा महिने ते वर्षभर पाणी मिळत नसल्याने त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून स्थळपाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. याबाबत बोलताना श्री. केळकर यांनी बेशिस्त शहर नियोजनावर सडकून टीका केली. ठाणे शहराला आधीच ४० एमएलडी पाण्याची कमतरता असल्याने गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना महापालिकेने परवानगी दिल्याने १५० मीटर उंचीच्या तब्बल ७९ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात लोकसंख्या आणखी वाढून पाणीटंचाईचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. २०१७ साली उच्च न्यायालयाने पुरेशा पाण्याची उपलब्धता होत नाही तोपर्यंत नवीन इमारत बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती, मात्र महापालिकेने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने बांधकाम स्थगिती उठविण्यात आल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
दुसरीकडे दळणवळणाची साधने वाढत असून रस्ते, बोगदे, मेट्रो आदी प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळात ठाण्याला पहिली पसंती मिळणार असल्याने नागरीकरण झपाट्याने होणार आहे. आयुक्तालय हद्दीत ७५ लाख वाहनांची नोंद आहे. एकूणच ठाणे शहराची क्षमता संपलेली असून सर्वपक्षीयांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज श्री. केळकर यांनी व्यक्त केली.
श्वान दंशाच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना श्री. केळकर यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा करण्यात आली असून प्रशासन १० दिवसांत भटक्या कुत्र्यांबाबत आदर्श नियमावली तयार करणार असून त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता श्री. केळकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात एका निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित राहून व्यथा मांडली. कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले असल्याने निराधार जीवन जगत आहे. याबाबत एका वृद्धाश्रमाशी संपर्क साधला असून लवकरच त्या व्यक्तीला वृद्धाश्रमात दाखल करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरसेवक दीपक जाधव, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका माधुरी मेटांगे, अमित सरय्या, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर