
यवतमाळ29 ऑगस्ट (हिं.स.)।
घाटंजी तालुक्यातील देवधरी ग्रामपंचायतीच्या कारभारात विविध विकासकामे आणि योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत महेश ठाकरे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्!यांकडे तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. देवधरी येथे करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची अल्पावधीतच दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नाल्यांचीही अवस्था खराब असल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी परिसरात चिखल व दुर्गंधी निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर गुरे बांधली जात असल्याने महिला, वृद्ध आणि शाळकरी मुलांनाही धोका निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ग्रामपंचायतीच्या मागील सात वर्षांच्या कार्यकाळात रस्ते व नाल्यांची पुरेशी कामे झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांतून मिळालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावात पथदिव्यांचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबतही तक्रारीत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निविदा न काढता कामे करणे, कामे न करता किंवा साहित्य खरेदी न करता देयके काढणे, कराची रक्कम खात्यात जमा न करता खर्च करणे, आरओ फिल्टरचे उत्पन्न-खर्च, सार्वजनिक शौचालय, खनिज व जनसुविधा, दलित वस्ती निधी तसेच नळ कनेक्शन आणि घरकुल योजनेतील लाभार्थी निवडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व बाबींची चौकशी समितीमार्फत तपासणी करून संबंधित ग्रामसेवकावर दोष आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी