
रत्नागिरी, 30 ऑगस्ट (हिं.स.) । भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चातर्फे येत्या मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी मंगळागौर स्पर्धा आणि सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे ही मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), ‘तुझ्यात जीव रंगला’ व ‘सरस्वती निवास’ फेम अक्षया देवधर (मास्तरीणबाई), ‘बाणू’ या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर, प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत तसेच स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू यांचा त्यात समावेश आहे.
भाजप महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर सोहळ्यामध्ये मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळागौर हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा, परंपरेचा आणि महिला शक्तीच्या एकतेचा उत्सव आहे. आधुनिकतेच्या युगातही आपल्या पारंपरिक खेळांना व संस्कृतीला जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे वर्षाताई ढेकणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम व्हावे, यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रत्नागिरीतील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगळागौर सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी