माजी सैनिकांसाठी १८१ पदांची रोजगार संधी
१३६ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) ईको महारमध्ये जेसीओ, सोल्जर जी.डी. आणि ट्रेडसमॅन पदांसाठी भरती छत्रपती संभाजीनगर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : माजी सैनिकांसाठी १३६ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) ईको महारमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जेसीओ, सोल्जर जी.डी. आ
माजी सैनिकांसाठी १८१ पदांची रोजगार संधी


१३६ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) ईको महारमध्ये जेसीओ, सोल्जर जी.डी. आणि ट्रेडसमॅन पदांसाठी भरती

छत्रपती संभाजीनगर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : माजी सैनिकांसाठी १३६ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) ईको महारमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जेसीओ, सोल्जर जी.डी. आणि ट्रेडसमॅन या पदांसाठी माजी सैनिकांमधून भरती करण्यात येणार असून, एकूण १८१ पदे उपलब्ध आहेत. पात्र माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

या भरतीमध्ये सैन्यसेवेतून जेसीओ, हवालदार, नायक, लान्स नायक आणि शिपाई या पदांवरून पेन्शन घेऊन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांमधून जेसीओची ४, सोल्जर जी.डी.ची १६२ आणि ट्रेडसमॅनची १५ पदे भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी निवृत्त जेसीओ उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे, तर इतर माजी सैनिकांसाठी ५० वर्षे आहे. सैन्यसेवेतून डिस्चार्ज झाल्यानंतरचा कालावधी पाच वर्षांपेक्षा अधिक नसावा. तसेच उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी SHAPE-I आणि चारित्र्य श्रेणी अनुकरणीय किंवा उत्तम असणे आवश्यक आहे.

निवड झाल्यानंतर जेसीओंना वयाच्या ५५ वर्षांपर्यंत, तर इतर माजी सैनिकांना ५० वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. मात्र, या नोकरीदरम्यान पेन्शन लागू राहणार नसल्याची नोंद पात्र उमेदवारांनी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

भरती प्रक्रिया १०९ इन्फंट्री बटालियन (टी.ए.) मराठा एल.आय. ग्राउंड, कोल्हापूर येथे १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. तसेच एआरवो ग्राउंड, छत्रपती संभाजीनगर येथे ८ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

भरतीसाठी पात्र माजी सैनिकांनी डिस्चार्ज बुक, पी.पी.ओ., शैक्षणिक दाखले, महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि फोटोग्राफ सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिकांनी या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande