
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.) | जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन नवजात बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतरही रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रसूतीसाठी गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर उच्च उपचारांसाठी नागपूरला रेफर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
महिलेची प्लेटलेट संख्या ४८ हजार असल्याने आयसीयू व्यवस्थापनाची आवश्यकता लक्षात घेऊन पीडीएमसी किंवा जीएमसी नागपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिल्याचे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिका इंगळे यांनी सांगितले. महिलेवर चार प्लेटलेट्स चढवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी १०८ वर सातत्याने संपर्क साधला जात होता. मात्र, रुग्णवाहिकेची व्यवस्था होण्यापूर्वीच कुटुंबीयांनी घाईघाईने खासगी वाहनातून महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना आणि रुग्णालयात पाच दिवस उपचार सुरू असताना रेफर करण्याची वेळ का आली? रुग्णवाहिका वेळेत का उपलब्ध झाली नाही? गरीब रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी अशी धावपळ का करावी लागते? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने मात्र महिलेची प्रकृती आणि कमी प्लेटलेट संख्या लक्षात घेऊन उच्चस्तरीय उपचारासाठी रेफर करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी