
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील भांबोरा येथे शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी चरणदास इखे यांच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने तातडीची पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. आरती राजेश वानखडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, चरणदास इखे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला आधार देण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी शासनाकडून एकूण २५ लाख रुपयांची पाच लाख रुपयांचा धनादेश तातडीने देण्यात आला असून, उर्वरित मदतही लवकरच मिळणार असल्याचे आरती वानखडे यांनी कुटुंबीयांना आश्वस्त केले. दरम्यान, मृत शेतकऱ्याच्या वारसाला कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची मागणी आरती वानखडे यांनी यापूर्वीच केली होती. या मागणीचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. त्यानुसार मृत चरणदास इखे यांच्या मुलाला तातडीने वनविभागात कंत्राटी तत्त्वावर रुजू करून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय नोकरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आरती वानखडे यांनी स्पष्ट केले. यावेळी आरती राजेश वानखडे, वनविभागाचे आरएफओ प्रशांत भुजाडे, नायब तहसीलदार विनोद वानखडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी