रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याच्या तक्रारीवर चित्रा वाघ संतापल्या
अमरावती, २९ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयात सोमवारी झालेल्या भीषण अग्निकांडानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी एका नवजात बाळाला घरी सोडण्यासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देताना ‘
अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात चित्रा वाघ यांची अधिकाऱ्यांना फटकार


अमरावती, २९ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयात सोमवारी झालेल्या भीषण अग्निकांडानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी एका नवजात बाळाला घरी सोडण्यासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देताना ‘डिझेल नसल्याने सेवा देता येणार नाही’ असे सांगण्यात आल्याची तक्रार त्यांच्या निदर्शनास आली. या प्रकारामुळे चित्रा वाघ यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना फटकारले.

नवजात बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. मात्र, रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध नसल्याचे कारण देत सेवा देता येणार नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले होते. ही माहिती मिळताच चित्रा वाघ यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

“सरकार आरोग्य सुविधांसाठी काम करत आहे; मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अशा निष्काळजीपणामुळे सरकारची बदनामी होते,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे. डिझेल उपलब्ध नसल्यासारखी कारणे सांगून रुग्णांना रुग्णवाहिका सेवेपासून वंचित ठेवू नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.नवजात बाळाला तातडीने घरी पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेशही चित्रा वाघ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, जिल्हा महिला रुग्णालयातील अग्निकांडानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याची तक्रार समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णांना वेळेवर आणि सुरळीत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande