
पुणे, 29 ऑगस्ट (हिं.स.)। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री न करता येणाऱ्या औषधाच्या पॅकेजिंगवर अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी तसेच औषधांच्या साठवणुकीत गंभीर अनियमितता आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वडकी (पुणे) येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ कंपनीचा सी अँड एफ औषध विक्री परवाना रद्द केला आहे.
एफडीएने जून २०२६ मध्ये वडकी येथील सिप्ला फार्माच्या मुख्य गोदामावर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान ‘रिॲक्टिन प्लस टॅब्लेट’ या शेड्युल एच औषधाच्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला ‘अनालजेसिक’ आणि ‘अँटीपायरेटीक’ असा मजकूर छापण्यात आल्याचे आढळून आले. प्रिस्क्रिप्शन आवश्यक असलेल्या औषधाच्या पॅकेजिंगवर अशा प्रकारचा अनधिकृत मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे ग्राहकांना डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने या औषधाचा ११ लाख १९ हजार रुपयांचा साठा जप्त केला होता.
याशिवाय, औषधांच्या साठवणुकीसंदर्भातही गंभीर त्रुटी आढळल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले. संबंधित औषधाचा साठा बाजारातून परत मागविण्याची कार्यवाहीही करण्यात आली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एफडीएने सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडचा सी अँड एफ औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु