
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू आगीची पाहणी
दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
अमरावती, २९ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू (SNCU) अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार चित्रा वाघ यांनी शनिवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन आगीच्या घटनेतील एसएनसीयू विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्य शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. त्यामुळे नेमके कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी करण्याची मागणी
रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे फायर ऑडिट झाले होते की नाही, रुग्णालय प्रशासनाने संबंधित विभागांशी आवश्यक पत्रव्यवहार केला होता का, तसेच अग्निसुरक्षेसंदर्भातील जबाबदारी नेमकी कोणाची होती, याचीही पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार वाघ यांनी केली.
तीन निष्पाप नवजात बालकांचा जीव गेल्याने या घटनेतील प्रत्येक बाबीची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. आगीचे नेमके कारण, अग्निसुरक्षा उपाययोजनांची स्थिती आणि संबंधित विभागांची जबाबदारी यांचा तपास करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी