शिस्त, नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द मैदानातूनच घडते - आ.डॉ.गुट्टे
परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)। क्रीडा ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची बाब नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर खेळाडूला विजयाबरोबरच पराभवही स्वीकारावा लागतो. त्यामुळे तालुका क्रीडा संकुल हे केवळ खेळांच्या सरावाचे केंद्र न राहता तालुक्
शिस्त, नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द मैदानातूनच घडते - आ.डॉ.गुट्टे   गंगाखेड तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण


परभणी, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

क्रीडा ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची बाब नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर खेळाडूला विजयाबरोबरच पराभवही स्वीकारावा लागतो. त्यामुळे तालुका क्रीडा संकुल हे केवळ खेळांच्या सरावाचे केंद्र न राहता तालुक्यातील खेळाडू युवकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावे. त्यासाठी प्रशासन, क्रीडा संस्था, प्रशिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण जिद्द, संयम, संघभावना, नेतृत्वगुण आणि पुन्हा उभे राहण्याची मानसिकता विकसित होते. शिवाय शिस्त, नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द मैदानातूनच घडते, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित क्रीडा संकुल हे अत्याधुनिक स्वरूपाचे असून, क्रीडा विषयक सर्व सोईसुविधा तेथे उपलब्ध आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या या क्रीडा सुविधांमुळे तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला भक्कम पायाभूत आधार मिळणार आहे.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, ग्रामीण भागात गुणवत्ता आणि प्रतिभेची कमतरता नसली तरी अनेकदा योग्य क्रीडा सुविधा, सरावाची साधने आणि आवश्यक मार्गदर्शनाअभावी खेळाडूंना अपेक्षित संधी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर गंगाखेड तालुका क्रीडा संकुलात उपलब्ध होणाऱ्या सुविधा स्थानिक खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या सुविधांमुळे तालुक्यातील युवक-युवतींना आपल्या क्रीडा कौशल्याचा विकास करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार असून, भविष्यात जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये शहर व तालुक्यातील खेळाडू प्रभावी कामगिरी करतील.

क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा ही प्रगतिशील वाटचालीचे महत्त्वाचे द्योतक मानली जाते. त्यामुळे पूर्ण झालेल्या बांधकामांचे लोकार्पण हा केवळ विकासकामाचा औपचारिक कार्यक्रम नसून तालुक्याच्या भावी पिढीच्या आकांक्षांना बळ देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संकुलातून शेकडो खेळाडूंना नियमित सरावाची संधी मिळून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. तसेच गोदाकाठच्या मातीतून राज्य आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, हीच या संकुलाच्या निर्मितीमागील व्यापक भूमिका असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande