
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद अमरावती येथील प्राथमिक व माध्यमिकशिक्षण विभागाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना आणि उपकरणे बसवणे तसेच ती अद्ययावत ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोर पालन करून येत्या १० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपल्या स्तरावरील अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश मुख्यध्यापकांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील सूचनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. शाळांमध्ये संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शाळेच्या प्रत्येक मजल्यावर, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि माध्यान्ह भोजन स्वयंपाकघरात चालू स्थितीतील अग्निशामक यंत्रे लावणे आवश्यक आहे.सर्व अग्निशामक उपकरणांची मुदत तपासून त्यांची दरमहा देखभाल व रिफिलिंग सुनिश्चित करावी. शाळेतील जिने, मुख्य द्वार आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग नेहमी मोकळे ठेवावेत. तिथे कोणत्याही प्रकारचे साहित्य साठवून ठेवू नये. असेही आदेशात म्हटले आहे.आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी वर्षातून किमान दोनदा विद्यार्थी व शिक्षकांसाठी मॉक ड्रिल आयोजित करावी.शाळेतील सर्व वायरिंग, मेन स्विचेस व विद्युत उपकरणांची अधिकृत इलेक्ट्रीशियनकडून तपासणी करून घ्यावी, जेणेकरून शॉर्ट सर्किटमुळे होणारा धोका टाळता येईल. असेही आदेश देण्यात आले आहेत.
माहिती फलक बंधनकारक -प्रिया देशमुख,शिक्षण अधिकारी माध्यमिक अमरावतीशाळेच्या प्रमुख ठिकाणी अग्निशामक दल (१०१), रुग्णवाहिका (१०२) व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे फोन नंबर स्पष्ट दिसतील असे फलक लावावेत.सदर आदेशांचे सर्व शाळांवर योग्य पालन होत आहे की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी स्थानिक गटशिक्षणाधिकारी व शिक्षण अधिकारी (म.न.पा. अमरावती) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी