बीडच्या सामान्य रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज आणि नॅपकिन
बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। ससून रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया; दोषी डॉक्टरांवर BNS कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी : बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसूतीनंतर झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाम
वंचित बहुजन आघाडीची मागणी


बीड, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

ससून रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया; दोषी डॉक्टरांवर BNS कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

: बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसूतीनंतर झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे २० वर्षीय संध्या गायकवाड यांच्या पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन राहिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड यांची बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन राहिल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागल्याने सोनोग्राफी करण्यात आली. या तपासणीत पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

यानंतर संध्या यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन काढले. मात्र, त्यानंतरही आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून आतड्यांवरील उपचार केले.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीने बीड येथील सामान्य रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय उपचारादरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

दरम्यान, संध्या गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या शिष्टमंडळाने ससून रुग्णालयात भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, युवक आघाडीचे प्रदेश सदस्य विशाल गवळी, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड, महिला आघाडी अध्यक्षा कोमल शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि संध्या गायकवाड यांना योग्य उपचार व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande