कशेडी भुयार गळतीमुक्त करण्याची ग्वाही; गणेशोत्सवापूर्वी वाहनचालकांना दिलासा मिळणार?
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी ठरलेल्या दुहेरी भुयारी मार्गातील पाण्याची गळती पाच वर्षांनंतरही कायम आहे. भुयाराच्या छतावरील कातळातून झिरपणारे पाणी रस्त्यावर पडत असल्याने मार्ग निसरडा हो
Even after five years, the Kashedi tunnel is not free from leakage.


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी ठरलेल्या दुहेरी भुयारी मार्गातील पाण्याची गळती पाच वर्षांनंतरही कायम आहे. भुयाराच्या छतावरील कातळातून झिरपणारे पाणी रस्त्यावर पडत असल्याने मार्ग निसरडा होत असून, आगामी गणेशोत्सवात वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कशेडी घाटातील दुहेरी भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५०२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्टने हे काम मिळवल्यानंतर एसडीपीएल या पोटठेकेदार कंपनीमार्फत २०१९ मध्ये भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. प्रत्येकी सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या दोन्ही भुयारी मार्गांची रुंदी १४ मीटर आणि उंची आठ मीटर आहे. २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्यानंतर काही अंतरावर छताकडील कातळातून भूगर्भातील पाणी भुयारात झिरपू लागले.

गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनानुसार शॉटक्रिट, पीव्हीसी मेम्ब्रेन, फायबर शीट तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी पन्हाळी व ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली. मात्र, पावसाळ्यात गळतीचे प्रमाण वाढत असल्याने रस्त्यावर पाणी पडण्याचे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे.

दरम्यान, एसडीपीएलचे अमोल शिवतारे यांनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला असून, लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळतीमुक्त करण्याची ग्वाही दिली. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनीही या माहितीला दुजोरा दिला.

भुयारी मार्गात व्हेंटिलेशन, सीसीटीव्ही, अग्निरोधक यंत्रणा, एलईडी दिवे आणि जनरेटर बॅकअपची सुविधा आहे. मात्र, गळतीबरोबरच जोडरस्त्यांवरील दरडी आणि लाल माती घसरण्याचा धोकाही कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. यंदा कशेडीच्या भुयारी मार्गातून गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा, एवढीच अपेक्षा आता चाकरमान्यांना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande