भंडारा, अन्नप्रसादालाही अन्न सुरक्षेचे नियम
लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवातील भंडारा असो किंवा महाप्रसाद अन्नवाटप करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली आहे. हा विषय सणाचा किंवा महाप्रसादाचा नाही, त
भंडारा अन्नप्रसाद


लातूर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।

गणेशोत्सवातील भंडारा असो किंवा महाप्रसाद अन्नवाटप करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली आहे. हा विषय सणाचा किंवा महाप्रसादाचा नाही, तर नियमांचे पालन करण्याचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि महाप्रसादासाठी अन्न परवाना आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना मुंढे यांनी यासाठी कोणताही नवा नियम केलेला नसून, अन्नसुरक्षेबाबतचे आधीपासून अस्तित्वात असलेले नियमच लागू असल्याचे सांगितले.

लातूर जिल्ह्यातही गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यामुळे आयोजकांनी अन्न तयार करण्याची जागा, पाणी, भांडी आणि कच्चा माल स्वच्छ ठेवण्याबरोबरच लागू असलेली नोंदणी अथवा परवान्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. सणाची परंपरा जपत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणे, हाच या नियमांचा उद्देश आहे.

दरम्यान, एफडीएकडून राज्यभर तपासणी मोहीम सुरू असून ३१ जुलैपर्यंत ३,१०० हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या १६५ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

भंडारा किंवा महाप्रसादाचे आयोजन करताना आवश्यक अन्न नोंदणी/परवाना, स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि अन्नाच्या गुणवत्तेची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांची माहिती आयोजनापूर्वीच संबंधित अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून घेता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande