सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत साखर व्यापारी, वितरक व मोठ्या गोदामांची तपासणी
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। साखरेच्या वाढत्या दरांसह राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि नफेखोरीला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अमरावती शहरात विशेष तपासणी
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील साखर व्यापारी, वितरक व मोठ्या गोदामांची तपासणी


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। साखरेच्या वाढत्या दरांसह राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि नफेखोरीला आळा घालण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने अमरावती शहरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत साखर वितरक, व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने २८ जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार साखरेच्या साठवणुकीवर निर्बंध लागू करण्यात आले असून, हे निर्बंध १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहेत. सरकारी संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता अन्य साखर विक्रेते व वितरकांना साखर प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही वेळी ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरमहा १० टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण अधिकारी, अमरावती शहर कार्यालयाच्या पथकाने डी-मार्ट परिसर, वियाणे चौक तसेच भोजवानी ट्रेडर्स, गंगाभगस ट्रेडर्स, शिवसहाय खंडेलवाल ट्रेडर्स आणि बद्रीनारायण खंडेलवाल ट्रेडर्स आदी ठिकाणी साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष तपासणी केली.

संबंधित व्यापारी व वितरकांना केंद्र शासनाच्या अन्नसाठा देखरेख पोर्टलवर साखरेच्या साठ्याची माहिती दर शुक्रवारी अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साठेबाजीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था व संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande