
अमरावती, २९ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बाळांच्या मृत्यूच्या घटनेवरून काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रुग्णालयात वारंवार दौरे करून केवळ तमाशा केला जात असून, प्रत्यक्षात सरकारचे कामकाज कुठेही दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
“या सरकारची काय नाटके सुरू आहेत, हेच समजत नाही. लोकप्रतिनिधी पर्यटनासारखे दवाखान्यात येत आहेत आणि आरडाओरडा करून निघून जात आहेत. मात्र, सरकारचा धाक या ठिकाणी राहिलेला नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अद्याप रुग्णालयात पोहोचले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “त्यांचा पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ मात्र समोर येतो,” असा टोला ठाकूर यांनी लगावला.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुविधांच्या प्रश्नावरूनही ठाकूर यांनी सरकारला लक्ष्य केले. हनुमान गाडीवर १२१ कोटी रुपये खर्च केले जातात; मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक नऊ कोटी रुपये दिले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
“उगाच नाटक आणि आरडाओरडा बंद करा. रोज कोणी हिरो-हिरोईनसारखे लोकप्रतिनिधी येऊन सरकार काम करत असल्याचे सांगतात; पण वास्तवात अमरावतीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे,” असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
तीन नवजात बाळांच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून, रुग्णालयातील पायाभूत सुविधा, अग्निसुरक्षा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी