
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। गाव हद्दीतील वीजवाहिनीला अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व वेलींचा विळखा दूर केल्यानंतर महावितरणने आता ३३ केव्ही वीजवाहिनीवरील वेली आणि फांद्यांची छाटणी केली आहे. गावातील महावितरण कार्यालयापासून १३२ केव्ही उपकेंद्रापर्यंतच्या नऊ किलोमीटर अंतरातील वाहिनी मोकळी करण्यात आली असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली.
महावितरण कार्यालयातून रहिवाशांच्या घरांपर्यंत रस्त्याच्या कडेला उभारलेल्या विद्युत खांब व वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जातो. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या आणि वेली वाढून वीजवाहिन्यांमध्ये अडकतात. त्यामुळे वीजवाहिनीला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढते. सध्या पावसाळा सुरू असल्याने वादळी वारे व मुसळधार पावसामुळे झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर तुटून पडण्याची शक्यता असते. फांद्यांच्या वजनामुळे वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडल्यास त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू राहण्याचा धोका असतो. अशा वाहिनीच्या संपर्कात व्यक्ती अथवा जनावरे आल्यास जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांमध्ये अडकलेल्या फांद्यांची पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे काम महावितरणकडून केले जाते.
गाव हद्दीतील कामे पूर्ण केल्यानंतर महावितरणने ३३ केव्ही वीजवाहिनीच्या नऊ किलोमीटर अंतरातील विद्युत खांब व वाहिनीवरील वेलींचा विळखा दूर केला. तसेच अडचणीच्या ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. सहायक अभियंता दिगंबर मौदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचारी जीवन खरात, सचिन बागडे, सूरज राघोर्ते, सुशील वाकोडे, नितीन कोल्हे, अभिजित गोवारे, मनीष उके व श्याम वाटाणे यांनी ही कार्यवाही केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी