


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) आंतरवाली सराटी येथे आपले 11 वे आमरण उपोषण सुरू केले आहे. जीवघेणा लढा आता सुरू झाला आहे, अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईला जाणार, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार, जात पडताळणी समिती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले.
मनोज जरांगे म्हणाले की, दोन महिने, चार महिने करत सरकारने तीन वर्षे वेळकाढूपणा केला.
आता आमच्या लक्षात आले आहे की सरकारच्या नियतीतच खोट आहे. त्यांना मराठ्यांच्या मुलाबाळांचे कल्याणच होऊ द्यायचे नाही. त्यामुळे आता सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis