
नवी दिल्ली, ३० ऑगस्ट (हिं.स.) २६ ऑगस्ट रोजी नेपाळच्या भोटेकोशी भागात आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठी मदत आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर यापूर्वी बेपत्ता झालेल्या सुमारे ५० इतर भारतीयांशी पुन्हा संपर्क साधण्यात आला आहे.
या आपत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधला, तीव्र शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मानवतावादी मदतीचे आश्वासन दिले. यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत ५९८ भारतीय नागरिक चीनमधून नेपाळमध्ये सुखरूप परतले आहेत. चीनच्या बाजूला असलेले जवळपास ९०० भारतीय सुरक्षित असून त्यांच्या संपर्कात आहेत. पण, २७५ हून अधिक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे १२८ लोक अजूनही बेपत्ता आहेत.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताने आतापर्यंत भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांमार्फत नेपाळला अंदाजे ५७.५ टन मदत साहित्य पोहोचवले आहे. यामध्ये तात्पुरती निवारागृहे, तंबू, ब्लँकेट्स, औषधे, अन्न, स्वच्छता किट, सौर दिवे, पाण्याचे पंप आणि विद्युत उपकरणांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराची सुरुंग बचाव आणि वैद्यकीय पथकेही बाधित भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. एक विशेष सुरुंग बचाव पथक, न्यायवैद्यक तज्ञ आणि मदत साहित्यासह आणखी एक विमान काठमांडूला पाठवले जात आहे. गरज भासल्यास एनडीआरएफची मदत, बेली ब्रिज आणि तांत्रिक पथके पुरवण्याची तयारीही भारताने दर्शवली आहे. या कठीण काळात भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक मदत पुरवत राहील, असे भारताने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे