दीर्घ राजकीय प्रवासानंतर दोघा मित्रांच्या उद्या एकाच पक्षीय बंधनात गुंफणार अतूट मित्रत्वाच्या गाठी
प्रताप देशमुख करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन परभणी, २९ ऑगस्ट (हिं.स.) : जय भवानी युवक मित्रमंडळाच्या माध्यमातून ३७ वर्षांपूर्वी जुळलेली संजय उर्फ बंडू जाधव आणि प्रताप देशमुख या दोन मित्
दीर्घ राजकीय प्रवासानंतर दोघा मित्रांच्या उद्या एकाच पक्षीय बंधनात गुंफणार अतूट मित्रत्वाच्या गाठी


प्रताप देशमुख करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन

परभणी, २९ ऑगस्ट (हिं.स.) : जय भवानी युवक मित्रमंडळाच्या माध्यमातून ३७ वर्षांपूर्वी जुळलेली संजय उर्फ बंडू जाधव आणि प्रताप देशमुख या दोन मित्रांची अतूट मैत्री, तब्बल ३७ वर्षांच्या परस्परविरोधी राजकीय प्रवासानंतर अखेर एकाच पक्षीय बंधनात गुंफली जाणार आहे. खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रताप देशमुख हे उद्या, रविवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

परभणी शहरातील मध्यवस्तीतील क्रांती चौकाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामापासून मराठवाडा विकासाच्या आंदोलनांपर्यंत विविध सभा-संमेलनांचे हे ठिकाण केंद्रबिंदू राहिले आहे. याच क्रांती चौक परिसरातील रहिवासी आणि परभणी नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष गोपाळराव देशमुख यांचे नातू प्रताप देशमुख यांनी १९८८ मध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘जय भवानी युवक मित्रमंडळा’ची स्थापना केली. त्यावेळी संजय उर्फ बंडू जाधव हे त्यांचे जिवलग मित्र म्हणून मंडळाच्या कार्यात अग्रभागी होते. याच काळात दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.

मात्र, १९८९ च्या सुमारास शिवसेना स्थापनेच्या लाटेत प्रखर हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेमुळे संजय उर्फ बंडू जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे, प्रताप देशमुख यांनी १९९१ पासून नगर विकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम सुरू केले.

तब्बल २५ वर्षांच्या नगरपालिका राजकारणात देशमुख यांनी विविध पदांवर काम करत आपला ठसा उमटवला. गटनेते, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि महापौर यांसारखी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. मात्र, मागील दोन महानगरपालिका निवडणुकांपासून ते राजकीयदृष्ट्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक अशी ओळख असलेल्या प्रताप देशमुख यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजनानंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संघटनात्मक बांधणीतही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. मात्र, मागील काही काळापासून ते पक्षीय राजकारणापासूनही काहीसे दूर होते.

दुसरीकडे, त्यांचे मित्र संजय उर्फ बंडू जाधव यांनी शिवसेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, गटनेते आणि सभापती अशी पदे भूषविली. प्रखर हिंदुत्वाच्या लाटेत त्यांनी दोन वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत राजकीय वाटचाल मजबूत केली.

राजकीय भूमिका वेगवेगळ्या असतानाही दोघांमधील मैत्री मात्र कायम राहिली. मित्र या नात्याने जाधव यांनी देशमुख यांना शिवसेनेत येण्यासाठी अनेकदा आग्रह धरला होता.

अखेर तब्बल ३७ वर्षांनंतर या मैत्रीला राजकीय वळण मिळाले असून, मागील महिन्यात प्रताप देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार उद्या रविवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रताप देशमुख आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन होणार असून, तब्बल ३७ वर्षे वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले हे दोन मित्र आता एकाच पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande