अमरावती : राज्य महोत्सव गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन
अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित क
राज्य महोत्सव गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन


अमरावती, 29 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक व पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या पोर्टलवरून सात सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. स्पर्धेत केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येईल. नवीन मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षांत राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिक मिळविलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदाच्या पारितोषिकासाठी पात्र ठरणार नाहीत. ही अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांनाही लागू राहणार आहे.

मंडळांनी केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे. विविध स्तरांवरील विजेत्या मंडळांना भरघोस रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय निवड समितीकडे आलेल्या ३६ जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांपैकी राज्यस्तरावरील पहिले तीन विजेते वगळता उर्वरित ३३ मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट मंडळांची निवड करताना कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन, निसर्ग तसेच सार्वजनिक संपत्तीचे संवर्धन, सामाजिक कार्य आणि गणेशोत्सव आयोजनातील विधायकता आदी निकषांवर १०० गुणांचे परीक्षण केले जाणार आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, महिलांचा ३० टक्के सहभाग आदी बाबींचाही विचार केला जाणार आहे. स्पर्धेचे सविस्तर निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजीचा शासननिर्णय पाहावा. तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळावरील संबंधित पोर्टलला भेट द्यावी. समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अमरावती विभागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन गुंडे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande