महसुली वादांना तडजोडीची वाट; १ सप्टेंबरपासून महात्मा फुले लोकअदालत
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड : महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर तडजोडीतून निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्वि
Path to compromise for revenue disputes; Mahatma Phule Lok Adalat starts from September 1.


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड : महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर तडजोडीतून निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. एखाद्या प्रकरणात एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जातो. परिणामी, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.

विधी सेवा प्राधिकरणाच्या लोकअदालतीच्या धर्तीवर या अभियानात दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने आणि तडजोडीच्या माध्यमातून महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पक्षकारांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळण्याबरोबरच त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चही वाचणार आहे.

महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या कमी करून अर्धन्यायिक यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः जमीनविषयक वादांमुळे अनेकदा कुटुंबांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये दीर्घकाळ संघर्ष निर्माण होतो. तडजोडीच्या माध्यमातून अशा वादांना पूर्णविराम देण्याची संधी या अभियानामुळे उपलब्ध होणार आहे.

महात्मा फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांना जलद, सुलभ आणि तडजोडीच्या माध्यमातून न्याय देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande